शेतकऱ्यांना अंतिम बील ४०० रू द्या … अंबालिका शुगरला निवेदन …
संपादक – प्रा सोमनाथ गोडसे ,973067980

कर्जत …आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अंबालिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेडने (बारडगाव सुद्रिक) मागील गाळप हंगामातील उसाचा अंतिम हप्ता म्हणून प्रतिटन किमान ४०० रुपये तातडीने द्यावा, अशी मागणी कर्जत तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कारखान्याच्या मुख्य कार्यकारी संचालक कृष्णा चौगुले व मुख्य शेतकी अधिकारी भोसले साहेब यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून विश्वासाने अंबालिका शुगर्सकडे ऊस पाठवत आहेत. चालू वर्षी खरीप हंगामातील पिकांचे झालेले नुकसान, शेती मशागतीचा वाढलेला खर्च, रासायनिक खते व औषधांची देणी, मुलांचे शैक्षणिक शुल्क आणि आगामी सणासुदीचा खर्च यामुळे शेतकरी वर्ग सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
कारखान्याने सुरुवातीचा हप्ता ३,१०० रुपये प्रतिटन या दराने नियमानुसार अदा केला आहे. मात्र, हंगामातील अंतिम बिलाची रक्कम अद्यापही प्रलंबित आहे. दिवाळी हा सर्वात मोठा सण असल्याने कष्टाचे फळ सणाच्या तोंडावर हातात मिळावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. ही अंतिम रक्कम दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्यास हजारो शेतकरी कुटुंबांची दिवाळी आनंदात आणि गोड साजरी होईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदनावर दत्तात्रय पाटील, राजेंद्र लोंढे, अरुण (आबा) लोंढे, माणिकराव लोंढे , सुरेश जगताप , रोहिदास परकाळे , अनिल पुंडे , अंबादास सुपेकर , चंद्रकांत लोंढे , हरिश्चंद्र लोंढे , बंडू जंजिरे यांच्यासह तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता कारखाना प्रशासन शेतकऱ्यांच्या या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.